पुरंदर रिपोर्टर Live
-विजय लकडे
इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील जय भवानी माता पॅनलने दमदार विजय मिळवत प्रतिस्पर्धी घोलप गटाला निर्णायक धक्का दिला. सभासदांनी 'दादा, मामा आणि बाप्पू' यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या मताधिक्याने जय भवानी माता पॅनलच्या पारड्यात भर टाकली. या विजयाने कारखान्याच्या भविष्यासाठी एक नवीन दिशा ठरवली आहे.
प्रचारादरम्यान सभासदांशी संवाद साधताना पृथ्वीराज जाचक यांनी छत्रपती कारखान्याला आर्थिक व व्यवस्थापनाच्या संकटातून बाहेर काढून त्याला पुन्हा एकदा राज्यातील अग्रगण्य कारखान्यांच्या यादीत आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या मते, ‘श्री छत्रपती’ कारखान्याचे नाव महाराष्ट्रातील पहिल्या पाच उत्तम साखर कारखान्यांमध्ये असावे, असा आपला प्रयत्न असेल. बापूंच्या या दृढ निर्धाराला सभासदांनी प्रचंड प्रतिसाद देत पॅनलला भरघोस मते दिली.
गेल्या काही वर्षांपासून छत्रपती साखर कारखाना अडचणीत सापडला होता. व्यवस्थापनातील दुर्लक्ष, आर्थिक अपयश आणि ऊस दरातील असमाधानामुळे सभासदांचा विश्वास डळमळीत झाला होता. इतर कारखान्यांशी (माळेगाव, सोमेश्वर) तुलना केल्यास, येथे सभासदांना ऊसाला तुलनेने कमी दर मिळत असल्याने अनेक सभासद बाहेरील कारखान्यांमध्ये ऊस पुरवठा करत होते. कारभारातील विस्कळीतपणा इतका होता की, छत्रपती कारखान्याला ऊस घालून अजित पवार यांनी तब्बल २८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची कबुली सभेमध्ये दिली होती.
ही स्थिती पाहता कारखान्याच्या निवडणुकीत पृथ्वीराज जाचक यांनी पुढाकार घेत सभासद,कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्याला अजित पवार यांची उपस्थिती लाभली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पुढील पाच वर्षांसाठी श्री छत्रपती कारखान्याच्या नेतृत्वाची धुरा पृथ्वीराज बापूंना सोपवली जाणार आहे. दादांनी आपल्या भाषणात माळेगाव व सोमेश्वर कारखान्यांच्या धर्तीवर छत्रपती कारखान्यालाही पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा मानस व्यक्त केला आणि सभासदांना जय भवानी माता पॅनलला भरभरून मतं देण्याचे आवाहन केले.
या स्पष्ट संदेशाचा जनतेवर प्रभाव पडला आणि सभासदांनी आपल्या कौलाने त्याला प्रतिसाद देत पॅनलला मोठ्या मताधिक्याने विजयी केले. जय भवानी माता पॅनलच्या या यशात अजित पवार, दत्तामामा भरणे आणि पृथ्वीराज जाचक यांची त्रिसूत्री भूमिका निर्णायक ठरली.
निवडणूक निकालानंतर अनेक सभासदांनी आशावाद व्यक्त करत सांगितले की, आता कारखाना पूर्ववत कार्यक्षम होईल, ऊसाला चांगला दर मिळेल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस येतील. पण या सगळ्याला साकार करण्यासाठी आता खरी कसोटी आहे ती पृथ्वीराज जाचक यांच्यावर. सभासदांनी व्यक्त केलेली अपेक्षा आणि विश्वास याला न्याय देण्याचं आव्हान आता त्यांच्या खांद्यावर आहे.
छत्रपतीचे शिवधनुष्य पृथ्वीराज बापूंना मिळाले आहे — हे ते योग्य तऱ्हेने उचलतात का, हे येणारा काळ ठरवेल.
0 Comments